संख्याशास्त्र आणि मेडिकल करिअर
इंग्लंडमध्ये असे म्हटले जाते की या देशाच्या पंतप्रधानाएवढा पगार पाहिजे असेल तर इंजिनिअरिंग आणि मेडिकलही नको तुम्ही संख्याशास्त्र (Statistics) मध्ये पदवी घ्या आणि स्पेशलायझेशन बायोस्टॅटिस्टिक्समध्ये करा. परिस्थितीमुळे किंवा मार्कांमुळे ज्यांना इंजिनिअर किंवा डॉक्टर होता येत नाही त्यांच्यासाठी संख्याशास्त्र विषयात पदवी तसेच पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) घेऊन मेडिकल किंवा औषधनिर्माण क्षेत्रातील कामाचा अनुभव घेतल्यास आयटी इंजिनिअरपेक्षा मोठे पॅकेज मिळू शकते.
बायोस्टॅटिस्टिक्स हे असे शास्त्र आहे जे औषध, जीवशास्त्र, पर्यावरण विज्ञान, सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी सांख्यिकीय सिद्धांत आणि गणितीय नियमांचा उपयोग करते. कोरोनाचा दररोजचा कल अभ्यासण्यासाठी याच शास्त्राची मदत घेतली जाते. लोकांचे सार्वजनिक आरोग्य आणि रोग तसेच विविध समुदायांमधील आरोग्य ट्रेंड ओळखण्यासाठी त्यांचे कारण निश्चित करण्यासाठी, आणि कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी सांख्यिकीय वैज्ञानिक पद्धती वापरतात. गेल्या दहा वर्षात या शाखेने करिअरच्या संधी निर्माण केल्या आहेत. भविष्यातही संधी निर्माण होत आहेत. आरोग्य क्षेत्रात सांख्यिकीय पद्धती वापरून पुढील नवीन करिअरच्या संधी निर्माण करू शकतो.
1) सध्याच्या उपचारांच्या तुलनेत नवीन औषधांच्या परिणामकारकतेचे विश्लेषण बिनचूक करू शकतो.
2) शारीरिक किंवा नैसर्गिक जोखीम घटकांचा रोग किंवा इतर आरोग्य परिणामांशी संबंध निश्चित करता येतो आणि एखाद्या रोगाचे नेमके निदान करता येते.
3) जैविक घटना आणि आरोग्य परिणामांची संभाव्यता स्पष्ट करता येते.
4) प्रयोगशाळेत निर्माण केल्या जाणाऱ्या औषधांचे प्राण्यांवरील आणि मानवी चाचण्यांचे निष्कर्ष हे सांख्यिकीय पद्धती वापरूनच तयार केले जातात.
5) लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या वयोवृद्धाला अनेक रोगांवर तयार केलेली लस दिली जाते, त्या लशीच्या निर्मितीपासून, मानवी चाचण्या आणि शेवटी कोट्यवधी लोकांना त्याचे डोस देणे या सर्व प्रक्रियांमध्ये सांख्यिकीय पद्धतीच वापरल्या जातात.
6) टेलिमेडिसिन आणि डिजिटल मेडिसिनच्या क्षेत्रातही संख्याशास्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.
लाखो विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनिअर हीच करिअरची क्षेत्रे खुणावत असतात. पण याच क्षेत्रात यापेक्षा वेगळे काही करण्याची आवड असलेल्यांनी बायोस्टॅटिस्टिक्स या क्षेत्राचा नक्कीच विचार करावा. माहिती गोळा करणे आणि अभ्यास करणे, परिस्थितीचा अंदाज लावणे आणि निष्कर्ष काढणे आवडत असल्यास, हे तुमच्यासाठी योग्य आरोग्य करिअर असू शकते. कोरोनानंतरच्या जगात या करिअरला जास्त मागणी आहे आणि सार्वजनिक आरोग्याच्या अनेक पैलूंचा शोध घेण्यात स्वारस्य असल्यास तुम्ही शैक्षणिक किंवा क्लिनिकल क्षेत्रामध्ये किंवा या पदवीसह खासगी सल्लागार म्हणून पुढे जाऊ शकता.
संख्याशास्त्रात संधी
आपण संख्याशास्त्र विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात कोणत्या संधी आहेत याबद्दल वाचले असेल. या लेखामध्ये या क्षेत्रातील भविष्यातील संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नक्की काय तयारी करायला हवी याबद्दल माहिती घेऊ.
संख्याशास्त्र हा गणित विषयापेक्षा अगदी वेगळा विषय आहे. गणितीय तर्कावरच या विषयाची मांडणी असली तरी अनेक मूलभूत संकल्पना या विषयाला गणितापेक्षा वेगळा करतात. या विषयामध्ये करिअर करायचे असल्यास काही गणितीय संकल्पना समजून घेण्याची गरज असते. मेडिकल क्षेत्रात गणितापेक्षा या विषयातील कुशल विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या विषयामध्ये अंतर्भूत असणारे संगणकीय भाषा कौशल्ये. विद्यार्थ्यांनी फक्त मूलभूत विषय न शिकता त्या जोडीला अनेक प्रकारच्या संगणकीय भाषासुद्धा शिकण्याची गरज आहे. लोकांच्या, मोठमोठ्या हॉस्पिटल्स, औषध आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्या यांच्या आवश्यकता पाहिल्यास नवनवीन संगणकीय भाषा कौशल्ये असणाऱ्यांची खूप गरज आहे.
साधारणपणे या क्षेत्रामध्ये मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप वापर होताना दिसून येतो. यासाठी ‘आर, पायथॉन, पाय स्पार्क, स्पार्कआर’ या संगणकीय भाषा किंवा सॉफ्टवेअर्स यांची आवश्यकता आहे. संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी या कौशल्यांची आवश्यकता आहे. याच्याच जोडीला SAS या संख्याशास्त्र आधारित तंत्रज्ञानाचीही आवश्यकता आहे. लस किंवा औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी संख्याशास्त्रीय मॉडेल्स वापरतात आणि त्यासाठी SQL आणि CQL या कौशल्यांची गरज लागते. विद्यार्थ्यांनी या संगणकीय कौशल्यांची माहिती घेऊन त्याचे अतिरिक्त अभ्यासक्रम पूर्ण केले पाहिजेत.
याचबरोबर अनेक औषध आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्या, गूगल, ॲमेझॉन सारख्या तंत्रज्ञान कंपन्याही मेडिकल क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी स्वतःच्या अशा संगणकीय भाषा संशोधित करत आहेत. विद्यार्थ्यांनी या नवीन घडामोडींवर लक्ष ठेवून त्यामधील नवीन कौशल्य आत्मसात करावे.
कौशल्याधारित अभ्यासक्रम
जगभरातील अनेक विद्यापीठांनी आणि कंपन्यांनीही या क्षेत्रातील संधी ओळखून त्यामधील नवनवीन कौशल्य आधारित अभ्यासक्रमांना सुरवात केली आहे. उदाहरणार्थ आयर्लंड या फक्त ६० लाख लोकसंख्या असणाऱ्या देशात २० विद्यापीठे आणि सर्वच औषधनिर्माण आणि मेडिकल क्षेत्रातील कंपन्या यांची कार्यालये आणि उत्पादन प्रकल्प आहेत. या देशातील सर्वच विद्यापीठांनी या क्षेत्रातील अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांना नवीन कौशल्यांचा अनुभव मिळावा म्हणून सहा महिने ते एक वर्षाचा थेट औषधनिर्माण आणि मेडिकल क्षेत्रातील कंपनीमध्ये इंटर्नशिप सक्तीची केली आहे आणि यासाठी त्यांनी या कंपन्यांबरोबर करार केले आहेत. याचा फायदा संख्याशास्त्र आणि गणित या दोन्ही विषयात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे.
अशाच प्रकारचे मॉडेल भारतीय विद्यापीठांनी अवलंबिल्यास हजारो विद्यार्थ्यांना फायदा होईल. भारतात हजारो औषधनिर्माण कंपन्या असून तिथे नवीन प्रकारच्या कौशल्यांची आणि गणितीय आणि संख्याशास्त्रीय तंत्रज्ञानाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घेतल्यास मूलभूत विज्ञानात पदवी घेऊनही संख्याशास्त्रातील विद्यार्थीही डॉक्टर इंजिनिअरसारखे करिअर करू शकतात.
0 comments:
Post a Comment